महाराष्ट्र दिन विशेष


इतिहासाच्या गल्लीतील,भविष्याची भीती
               १५ ऑगस्ट १९४७...असंख्य बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालेला दिवस. स्वतंत्र भारताची जडण-घडण करताना आपल्या सरकरने उचललेलं पाहिलं पाऊल म्हणजे भाषावार प्रांतरचना. त्यावेळी "बॉम्बे प्रेसिडेंसि" हे एक राज्य होत, ज्यात महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई कोकणसह गुजरात मधील काही भाग समाविष्ट होता. त्याकाळच्या काही प्रभावशाली व्यक्तींना मुंबई ही गुजरात मध्ये समाविष्ट व्हावी असे वाटत असताना जनमताचा कौल मात्र काही वेगळेच दर्शवत होता. याच सामान्य जनतेतून नेतृत्व म्हणून  सरसावलेल्या प्र.के.अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख इत्यादींच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या चळवळीतून दिल्या गेलेल्या १०६ प्राणांच्या बलिदानानंतर मे १९६० रोजी उदय झाला आजच्या महाराष्ट्राचा.
             ह्या महाराष्ट्राने अनेक महान व्यक्तिमत्व आपल्या मातीत घडवली. अगदी महाराजांपासून टिळकांपर्यंत, फाळकेंपासून  लतादीदींपर्यंत, अजित वडेकरांपासून मास्टर ब्लास्टर तेंडुलकर पर्यंत. ज्या राजाची कीर्ती देशविदेशात मिरवली जाते, ज्याच्या युद्ध शास्त्राचे आजही पाश्चात्य देशांना सुद्धा कुतूहल वाटते असे शिवछत्रपती घडले ते याच मातीत, झटले ते याच महाराष्ट्र राज्याचा स्वराज्य करण्यासाठी.... भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो ते दादासाहेब फाळके, गानसम्राज्ञी म्हणवल्या जाणाऱ्या लतादीदी ज्यांच्या आवाज ऐकून कोकिळा सुद्धा लाजेल, क्रिकेटचा देव म्हणवला जाणारा, ज्याची  बॅटिंग सुरु झाल्यावर संपूर्ण देश थांबायचा असा आपला लाडका सचिन तेंडुलकर हे आणि असे अनेक मौल्यवान व्यक्ती महाराष्ट्राने जगाला दिली. त्याचबरोबर आपल्या देशासाठी प्राण पणास लावणारे अनेक शूर सुद्धा महाराष्ट्रात चमकले. वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, राजगुरू, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर अश्या अनेकांनी देशासाठी आपले बलिदान दिले.

             महाराष्ट्राला एक समृद्ध धार्मिक आणि सामाजिक वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मीराबाई, संत जनाबाई, संत गाडगे महाराज अशी कितीतरी संतांची मांदियाळी महाराष्ट्राच्या मानवी मनाला नवचेतना देत गेली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज यासारख्या समाजप्रबोधकांनी महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या या ओळींमधून घडते-
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या सांग्याने जागल्या,
दऱ्याखोऱ्यातील शिळा.
त्याचबरोबर महाराष्ट्राला लाभलेलं आणखी एक वैभव म्हणजे महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास. महाराष्ट्रातील ३६० किल्ले, अजिंठा-वेरूळ लेणी, कोल्हापूर-साताऱ्याचे राजमहाल अशी अनेक इतिहासाची जाण करून देणारी स्थळे आहेत, पण आज याच ऐतिहासिक वास्तूंचे आपण किती जतन करतोय? या वास्तूंच्या दुर्वस्थेला कारण कोण? आज महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या पडलेल्या भिंती, ढासळलेली तटबंदी, तिथे कोरलेली प्रेमी युगुलांची नाव काय दर्शवतात? आपला इतिहास?  आपण पुतळे उभारू शकतो पण  त्यांची खरी ओळख असलेल्या त्यांच्या वास्तू जपू नाही शकत?
               महाराष्ट्राने आजपर्यंत कला, क्रीडा, नाटक, चित्रपट, शिक्षण, संस्कृती, संगणक, संगीत अशा अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. पण खरंच महाराष्ट्र विकसित झालाय असं म्हणू शकतो का आपण? गेल्या काही वर्षात आपले राज्य कुठल्या दिशेला चाललं आहे? इतक्या वर्षात मूलभूत प्रश्न सुटले नाहीत आपल्याला? देशाची आर्थिक राजधानी असलेले राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येत देशात अग्रेसर का? जगाच्या वापरातील ५०% कांदा उत्पन्न करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाच कांद्याचा योग्य भाव मिळू नये? मेहेनतीने पिकवलेला कांदा फुकट वाटण्याची, रस्त्यावर फेकण्याची वेळ त्यांच्यावर का यावी? जगातील सगळ्यात महागडं घर महाराष्ट्रात पण बहुतांश जनतेला राहण्यासाठी घर नाही एवढी आर्थिक विषमता का?  ज्या महाराष्ट्रात महाराजांनी कधी आया-बहिणींवर वार नाही होऊ दिले, तिथे आज बापच पोटच्या पोरीचा बलात्कार करतोय? एकीकडे गावी दुष्काळाचे सावट असताना, शहरात हजारो लिटर पाणी रिसॉर्ट मध्ये फक्त मजा मस्ती करायला वापरणं बरोबर आहे का? आज महाराष्ट्राच्या खेडे गावातील जनता काही मूलभूत सुविधांसाठी लढते आहे, झगडते आहे आणि शहरातील जनतेला ते माहित पण  नसावं? ही सर्व शोकांतिकाच म्हणावी लागेल. हे सर्व चित्र पाहताना सारखं मनात येत खरंच महाराष्ट्र प्रगती करतोय का? खरंच महाराष्ट्र स्वतंत्र झालाय का? कि सत्ता अजूनही दिल्लीतच आहे फक्त औरंगजेबाची जागा आता कोणीतरी दुसऱ्याने घेतली आहे? हेच का ते महाराजांच्या स्वप्नातले स्वराज्य? हाच का तो शाहू,फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र? त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या १०६ जणांच्या मनात हा असाच महाराष्ट्र होता का?

              आज प्रगतीच्या शर्यतीत धावताना माणुसकी, इतिहास, महाराष्ट्र घडण्यासाठी दिले गेलेले बलिदान आपण मागे सोडतोय का? फक्त जिंकण्यासाठी? आपण कधी स्वतःला सांभाळून घेणार? आणखी एक औरंगरंजेबाचे आक्रमण झाल्यावर?  खर तर तेव्हा सुद्धा सांभाळता नाही येणार कारण आज PUBG खेळणाऱ्या  युवकातून मावळा खुद्द शिवाजी राजांना सुद्धा घडवता नाही येणार.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


                                                                                                                                          -श्री नलावडे
                                                                                                                                            अभिषेक फाटक

Comments

  1. Great thoughts shree...aaj kal marathi blogs khupp mushkil ne baghyala bhetat ...great efforts done bye u n ur team ...asach changle thoughts spread karat raha n aplya generation mostly hai kahich mht nasta tyachi tumhi changli janiv karun detyt...👍👍

    ReplyDelete
  2. उत्तम विचार. महाराष्टातल्या राजकारणी लोकांनी ही दुर्दशा केली आहें व फक्त स्वतःच्या स्वार्थामुळे आपली परंपरा ते विसरले. 15वर्षे केंद्रात शेतकी मंत्री असूनही शेतकरी आत्महत्या करतात he आपले दुर्दैव. पाण्यासाठी वणवण फिरणारे आपले गावकरी बघून खूप वाईट वाटते. समाजात जागरूकता आली पाहिचे त्यासाठी शाळेपासून पाण्याचे नियोजन; किल्लाचे महत्व संस्कृती चे महत्व शिकवले पाहिजे. ब्लॉग उत्तम.

    ReplyDelete
  3. Very well written Shree
    Hats off to your marathi
    Keep it up

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेखन, मोजक्या शब्दात जास्तीत जास्त मुद्दे मांडून वाचकाला माहितीने समुद्ध करणे आणि त्याच वेळी अत्यंत यथार्थ प्रश्नांबद्दल अंतर्मुख करून बदल घडवून आणायला भाग पडणे ही लेखकाची हातोटी...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मानवाची प्रगती,निसर्गाची अधोगती

गीतकार राष्ट्रगीताचा