मूलभूत कर्तव्य. जबाबदारी की गरज?

वेळ असेल १०-१०.३०.... बदलापूर वरून डोंबिवलीला ट्रेनने येत होतो. उशीर झाल्याने ट्रेन तशी रिकामीच होती. बाजूलाच आमच्या एका कुटुंबाचे चाललेले संभाषण कानावर आलं.... देशाच्या सध्याच्या स्थितीवर, भविष्यावर त्यांचं संभाषण चालू होतं. चालली होती. काही राजकीय पक्षांची निंदानालस्ती... अचानक त्यातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस राजकीय पक्षांबद्दल बोलण्यास अडविले. त्या व्यक्तीने प्रत्युत्तर म्हणून मूलभूत हक्कांचा विषय काढला व त्यास अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आठवण करून दिली. मग संविधानातील मुलभूत हक्कांवर त्यांची चर्चा सुरू झाली. संभाषणादरम्यान त्यातील एका व्यक्तीने गुटखा चघळून लाल भडक झालेल्या तोंडातून आपल्या लाळेची पिचकारी अतिशय कलात्मक रीत्या ट्रेनच्या एका कोपऱ्यात मारली तर दुसऱ्याने संत्री व केळ्याचे साल काढून अगदी सहजरित्या ट्रेनच्या खिडकी बाहेर फेकून दिले. हे दृश्य पाहून मला आणि माझ्या मित्राला प्रश्न पडला की ज्या संविधानातील मूलभूत हक्कांविषयी ते बोलत होते त्याच संविधानाने आपल्याला काही ही मूलभूत कर्तव्ये सोपविली आहेत याचा त्यांना विसर कसा काय पडला?
संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण दैनंदिन जीवनात अशा बऱ्याच गोष्टी करतो की ज्यामुळे ह्या कर्तव्यांचे उल्लंघन होते. त्या व्यक्तीचेच उदाहरण घ्या ना, ट्रेन ही सार्वजनिक मालमत्ता आहे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे, ती स्वच्छ ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे जी संविधानातील कलम 51 ए मध्ये नमूद केलेली आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही ही सरास गुटखा विकला जातो ही गोष्ट आक्षेपार्हच नाही का? जी माणसे भारतातल्या रस्त्यावर चालता फिरता थांबतात, पिचकारी मारतात तीच माणसे बाहेर कुठे अथवा परदेशात गेल्यावर असं करत नाहीत असं का? या देशातील नागरिकांचे आपल्या देशाप्रती काहीच कर्तव्य नाही.... सार्वजनिक ठिकाणे आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे ही तर तिसरी-चौथीच्या मुलांना सुद्धा माहिती आहे मग यात आपल्या सारखी माणसं का बरे मागे पडतात..
        मुंबईतील मरीन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी वर्षाच्या बारा महिने  चिक्कार गर्दी असते आणि तितकाच कचरा सुद्धा... येणारी गर्दी नेहमीची असून सुद्धा तेथे कचरा होणे, दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून राहणे अथवा कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला प्लास्टिकचे ग्लास, ताट, वाट्या आणि कचरा हा नेहमीच कसा असतो प्रत्येक वेळी सरकारला दोष देण्यापेक्षा स्वतःचा आत्मपरीक्षण करून आपणच आपली कर्तव्य बजावताना कुठेतरी मागे राहतोय राहतोय असे नाही का वाटत?  रस्त्याच्या बाजूला पडलेला एक कागदाचा तुकडा कोण उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकेल याची वाट बघणाऱ्या व्यक्तींना मूलभूत कर्तव्यावर बोलायचं खरच अधिकार आहे का?
एकेकाळी मुंबईचा समुद्र निळाशार दिसायचा,आज त्यात फक्त तरंगत प्लास्टिक आणि कचरा दिसतो. जे हाल आज समुद्राचे आहेत तेच नद्या आणि सरोवरांचे देखील. गंगा चंद्रभागा यासारख्या नद्यांना आपण देवता मानतो पण याच नद्या आज खूप प्रदूषित झाल्या आहेत... गणेशोत्सव किंवा नवरात्रीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या, निर्मल्याच्या नावाखाली कुजलेली फुले फोटो आपण अगदी सहज नद्यांमध्ये विसर्जित करतो पण हीच विसर्जित होणारी मूर्ती ती जर शाडूची असेल तर बरं नाही का? निर्माल्य खत बनवून आपण जर ते एखाद्या झाडाला पुरवले तर चालणार नाही का? निसर्ग म्हणजे ईश्वराने मनुष्यजातीला दिलेले एक अमूल्य वरदान आहे... मनुष्याचा विकास आणि विनाश या दोन्ही गोष्टी घडवून आणण्याची क्षमता निसर्गाकडे आहे हे आपण केदारनाथचा प्रलय आणि केरला मध्ये झालेली अतिवृष्टी यावरून अनुभवलेच असेल. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी निसर्गाने आपल्याला लागेल तेव्हा साथ दिली आज गरज आहे ती या निसर्गाला वाचवण्याची प्रदूषणाला वेळीच आवर घालण्याची. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जातं करणे,संवर्धन करणे हे सुद्धा आपले एक मूलभूत कर्तव्य आहे.
    पण आपल्या हक्कांबाबत जागरूक आहोत, तितकेच आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्यावर जागरूक असणे, ते कर्तव्य पार पाडणे, ते कर्तव्य पार पाडण्यात समाजाची मदत करणे, समाज प्रबोधन करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे... देश चालवणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. देश बनतो तिथे असलेल्या देशवासीयांना मुळे, प्रत्येक आपत्तीत उभारणाऱ्या नागरिकांमुळे. आपलं घर हे दहा बाय दहाची खोली किंवा चार भिंतींत पुरता मर्यादित नाही, तर बाहेरचा निसर्ग ,प्राणी, पक्षी, दगड -माती ,झाडे देखील आपल्या परिवाराचा एक अमूल्य भाग आहेत याची जाणीव जितक्या लवकर मानवाला होईल तेवढे चांगले....
     जाता जाता एवढेच सांगु की आज पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाने आपला देश म्हणजे आपले घर आणि आपला निसर्ग म्हणजे आपला देव ही संकल्पना डोक्यात ठेवली पाहिजे. मूलभूत कर्तव्य ही आपली जबाबदारी तर होतीच परंतु आज ती काळाची गरज बनली आहे. देशाच्या प्रगतीत हातभार लावायचा असेल तर मूलभूत कर्तव्याचे पालन केलाच पाहिज

                                                      -अभिषेक फाटक

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मानवाची प्रगती,निसर्गाची अधोगती

गीतकार राष्ट्रगीताचा

महाराष्ट्र दिन विशेष